आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सत्कर्मालाच लाभतो ईश्वरी कृपाशिर्वाद : प. पू. आचार्य श्री चंदनाजी

Spread the love

पुणे : आयुष्यात सत्कर्माचा संकल्प करा. त्याला ईश्वरी शक्तीचे पाठबळ नक्की लाभेल. जी व्यक्ती सत्कर्म करते तिला आयुष्यात ईश्वर मदत करतो आणि ईश्वराचा कृपाशिर्वाद लाभतो, असे प्रतिपादन पद्मश्री प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांच्या अमृतवाणीचा आनंद उपस्थितांनी घेतला. आयुष्यातील कर्म कसे असावे या विषयी पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी आणि प. पू. साध्वी श्री शिलापीजी यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी सत्कर्माला ईश्वराचे पाठबळ कसे मिळते त्याचे उदाहरण सांगितले. त्या म्हणाल्या, भगवान महावीरांनी आपल्या आयुष्यातील प्रदीर्घ काळ जिथे व्यतित केला त्या बिहारमध्ये मी जेव्हा ५० वर्षांपूर्वी गेले तेव्हा तेथील अवस्था पाहून मी व्यथित झाले होते. तिथे चांगले कार्य उभे करण्याचा मी संकल्प केला.

एकदा तेथील मुलांसाठी व वृद्धांसाठी डोळ्यांची शस्त्रक्रिया आयोजित केली होती. त्यासाठी भल्या मोठ्या मैदानात तंबू उभारून शेकडो शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. परंतु आदल्या रात्री मला काही तरी संकट येणार आहे, अघटित घडणार आहे याची जाणीव झाली आणि सगळ्यांना तातडीने खोल्यांमध्ये हलवण्यास सांगितले.

त्याच रात्री भीषण वादळ आले. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया झालेल्यांपैकी कुणालाही त्रास झालेला नव्हता असे समजले तेव्हा बरे वाटले. यातून आपल्या लक्षात येईल की आपण जेव्हा सत्कार्य करत असतो तेव्हा त्यामागे जी करुणा, पुण्यभाव, शुभभाव असतो त्याच्या शक्तीमुळे उपद्रव होण्यापूर्वीच आपल्याला त्याची पूर्वसूचना मिळते.

याचे प्रत्यंतर अशा अनेक प्रसंगांमध्ये मला आलेले आहे. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच सत्कर्म घडते. त्याशिवाय चांगले काम हातून घडत नाही. त्यामागचा आपला संकल्प दृढ आणि शुद्ध असेल तर त्याला ईश्वरी शक्तीचे पाठबळ निश्चितपणे मिळते. जेव्हा तुम्ही चांगल्या कार्याचा संकल्प कराल तेव्हा चांगली माणसेच तुम्हाला जोडली जातील.

प. पू. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, आपली जितकी क्षमता आहे तितकेच आपण पाहू शकतो परंतु तीर्थंकर मात्र पूर्ण सत्य पाहू शकतात. म्हणून ‘मी पाहिले तेच सत्य’ हा आग्रह सोडून इतरांच्याही मतांचा आदर करायला शिका. आपले मन कसे आहे, आपण विचार कसा करतो हे स्वतःमध्ये डोकावून पाहायला हवे.

टोकाचे वैमनस्य, द्वेष असणारी काही माणसे आत्मघाती प्रवृत्तीची असतात. माझे नुकसान झाले तरी चालेल परंतु इतरांचे अधिक व्हायला हवे अशी त्यांची वृत्ती असते. दुसऱ्याचे नुकसान करायचे परंतु स्वतःचे नुकसान होऊ द्यायचे नाही अशाही प्रवृत्तीची काही माणसे असतात.

दुसऱ्याचे मुद्दामून नुकसान करणार नाहीत परंतु स्वतः दोन पावलं पुढे टाकून चांगलेही काही करणार नाहीत अशाही प्रवृत्तीची माणसे असतात आणि स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याच्या हितासाठी जी प्रयत्नशील राहतात ती प्रवृत्ती महापुरुषांची असते.

दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करणे ही मोठी गोष्ट आहे. ‘माझ्यासाठी काय’ इथपासून दुसऱ्यांचा आधी विचार करणारा साधक श्रेष्ठ होत जातो. तेव्हा आपण या प्रकारात कुठे बसतो, स्वार्थाचा विचार किती करतो आणि दुसऱ्यांचा विचार किती करतो हे पाहायला हवे. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देताना अपेक्षा ठेवत नाही.

फूल सुगंध देताना अपेक्षा ठेवत नाही त्याप्रमाणे महापुरुष इतरांचे कल्याण करताना कोणत्याही अपेक्षेविना करतात. आपल्याही चेतनेचा विकास होतो तस-तसे आपण दुसऱ्यांचा विचार करायला शिकले पाहिजे. स्वतःला कष्ट पडले तरी दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार महत्त्वाचा आहे, असे विचार प. पू. साध्वी श्री शिलापीजी यांनी मांडले.

get_footer();