आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला ७५ वा संविधान दिन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Sports • November 28, 2024
Spread the love

पुणे : दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली होती, मात्र त्यापैकी भारत एकटा असा देश आहे जो आजही लोकशाही म्हणून शाश्वतपणे उभा आहे. इतर लोकशाही असलेल्या देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांतच लोकशाही कोसळली, मात्र भारतीय लोकशाही ७५ वर्षे यशस्वीरित्या अस्तित्वात आहे.

याच श्रेय भारतीय संविधान, त्याचे शिल्पकार, भारताचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, भारतीय मीडिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याच भारतीय जनतेला जाते, असे मत नामांकित कायदे अभ्यासक आणि संविधान कायदे तज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. ते सूर्यदत्त विधी महाविद्यालय येथील ७५ व्या संविधान दिनाच्या उत्सवात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

भारतीय संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त विधी महाविद्यालयाने, बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये संविधान दिनाचा उत्सव आयोजित केला. या कार्यक्रमाचे आयोजन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा उपभोक्ता आयोगाचे माजी न्यायधीश उमेश जावलीकर यांनी कायद्याच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वावर प्रकाश टाकला. “तुम्ही कायदा शिक्षणाची सुरूवात केली आहे, याचा अर्थ तुमची ‘लेमॅन’ पासून ‘लॉमन’ कडे जाण्याची यात्रा सुरू झाली आहे, जी तुम्हाला लोकशाहीच्या विविध पैलूंना समजून घेण्यास मदत करेल,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. उल्हास बापट यांनी “संविधानाची ७५ वर्ष” या विषयावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी विविध प्रकारच्या लोकशाहींचा उल्लेख करत भारतीय लोकशाहीची रचना आणि संविधान शिल्पकारांच्या योगदानावर चर्चा केली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अतिथींनी भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. तसेच, सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील संविधान क्लबचे उद्घाटन करण्यात आले. पॅनेल चर्चा आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहायक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचा केतकी बापट, सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर अँड डिजिटल सायन्सचे प्राचार्य अरिफ शेख, डॉ. आनंद गायकवाड यांसह सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

स्वागत सहाय्यक प्राध्यापक विजयदीप मुंजंकर यांनी केले, तर केतकी बापट यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे समन्वयन सृष्टी धायगुडे, प्रथम वर्ष बी.ए. एल.एल.बी.च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपात सहाय्यक प्राध्यापक निलेश सरवडे यांनी आभार व्यक्त केले.

प्रा. डॉ. संजय बी चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन समाजातील राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जागरूकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे, जेणेकरून विद्यार्थी जबाबदार नागरिक घडतील आणि भारताला महासत्ता बनविण्यासाठी योगदान देतील.

मूलभूत कर्तव्ये आणि जबाबदारी या प्रति जागरूक असण्याची आज सर्वाधिक गरज आहे तसेच संविधानाची माहिती सर्वाना असण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

get_footer();