आवृत्ती पुणे
← Back to Homepage

२१ लाख रुपयांचा गांजा, चरस जप्त

Spread the love

विक्री करणाऱ्या पाच जणांना अटक

पुणे : पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी कारवाई करुन गांजा, चरस, एल.एस.डी. डॉट पेपर जप्त करुन पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 20 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सांगवी स्मशानभूमीजवळ असलेल्या एस.टी. कॉलनीच्या मैदानावर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सांगवी मधूनच दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणी ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय 26), अनिकेत अनिल गोडांबे (वय 25), रोहन उत्तम कांबळे (वय 21), रुपेश गौतम जाधव (वय 21), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (वय 24, सर्व रा. पी.डब्ल्यु.डी. कॉलनी, दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे.

विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष (रा. बाणेर), मयूर प्रवीण बाराथे यांच्या विरोधात एन.डी.पीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक विजय दिपक दौंडकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी स्मशान भूमिजवळ काहीजण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा 7 किलो 200 ग्रॅम गांजा, चार लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 175 ग्रॅम चरस, एक लाख 80 हजार रुपये किमतीचे 12 एलएसडी डॉट पेपर, सहा मोबाईल फोन, एक कार, तीन दुचाकी असा एकूण 20 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपींसोबत असलेला मयूर बाराथे हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.

अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता विशाल कदम याने गांजा आणून दिल्याचे सांगितले. तर चरस त्यांनी स्वत: मध्य प्रदेश येथून सेनानी नावाच्या व्यक्तीकडून आणले होते. एलएसडी पेपर हा अमली पदार्थ बाणेर येथे राहणाऱ्या हर्ष याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे करीत आहेत.

get_footer();