आवृत्ती पुणे
← Back to Homepage

३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

Spread the love

पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराबाबत माहिती देताना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी सांगितले की, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.

पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९३ पासून संचेती हॉस्पिटलमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरांचे आयोजन सुरू होते. त्यांच्या निधनानंतर गेल्या १४ वर्षांपासून हे कार्य त्यांचे शिष्य, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वाइनस्टीन यांच्या मार्फत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे.

डॉ. वाइनस्टीन दरवर्षी अमेरिकेतून भारतात येऊन रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करतात. या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूप व्रण व डाग, नाक व कानांवरील बाह्यव्यंग, पापण्यांच्या विकृती, फुगलेले गाल, चिकटलेली बोटे यांसारख्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिबिर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी दिली.

शिबिर तीन दिवसांचे असले तरी रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी फक्त शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या रुग्णांवर उर्वरित कालावधीत शस्त्रक्रिया पार पडतील.

दरम्यान, डॉ. लॅरी वाइनस्टीन व त्यांच्या टीमकडून जानेवारी २०२६ महिन्यात पुणे, जळगाव, नाशिक, संगमनेर तसेच दिल्ली येथेही अशाच प्रकारची मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

get_footer();