आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गुजरातचे नाव

Spread the love

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला विक्रम!

गुजरात : गुजरातमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विश्वविक्रम प्रस्थापित झाला असून हा २०२४ मधला पहिला विश्वविक्रम ठरल्याची प्रतिक्रिया गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशभरात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कुठे एकत्रित जल्लोष तर कुठे नवे संकल्प असं वातावरण असताना गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामुळे गुजरातचं नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या नियोजनाची पाहणी करण्यासाठी स्वत: हजर होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व गृहमंत्री हर्ष संघवी हेही उपस्थित होते. हर्ष संघवी यांनी या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.
नेमकं घडलंय काय?
गुजरातमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक संख्येनं लोकांनी एकाच वेळी योगा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. आता त्याच पद्धतीने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक संख्येनं लोकांनी सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातच्या मोढेरा सूर्य मंदिर व आसपासच्या भागात या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरातचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी या उपक्रमात विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याचं जाहीर केलं आहे.
“मी इथे सर्वाधिक लोकांकडून सूर्यनमस्कार घातले जाण्याच्या उपक्रमाचं परीक्षण करायला आलो होतो. हा एक नव्या प्रकारचा विक्रम आहे. याआधी कुणीही अशा प्रकारचा विक्रम प्रस्थापित केलेला नाही. त्यामुळे आम्ही किमान ३०० ची संख्या अट म्हणून ठेवली होती. त्याव्यतिरिक्त इतर अनेक मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जाणं आवश्यक होतं. त्यानंतरच हा विक्रम प्रस्थापित होऊ शकला असता. इथे मी स्वत: या सगळ्या उपक्रमाची पाहणी केल्यानंतर त्यांनी हा विश्वविक्रम प्रस्थापित केल्याचं मी जाहीर करतो. त्यांनी हाच उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणीही केला आहे. त्यामुळे या विश्वविक्रमासाठी त्यांचं अभिनंदन”, अशी प्रतिक्रिया स्वप्नील डांगरीकर यांनी दिली.
आज २०२४ मधला हा पहिला विश्वविक्रम ठरला आहे. आज किमान ४ हजारहून जास्त लोकांनी मोढेरा सूर्य मंदिरात सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग घेतला आहे. इतरही ५० ठिकाणी असाच उपक्रम राबवण्यात आला आहे”, अशी माहिती हर्ष संघवी यांनी दिली.

get_footer();