आवृत्ती पुणे
← Back to Homepage

104 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : 5 लाखांचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-2च्या पथकाने अटक केली. आरोपीने तब्बल 104 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 लाख रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय-34 रा. आंबेडकर वसाहत, डिपी. रोड औंध) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने 10 मार्च 2021 रोजी कात्रज येथील प्रदीप स्वामी आणि सतीश करंदीकर यांच्या बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरातील 2 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट-2च्या पोलिसांना कात्रज येथे एक वर्षापूर्वी जयवंत गायकवाड याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. 4 यांच्या आदेशाने आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली.

आरोपीने सखोल चौकशीत त्याने कात्रज येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने पुणे आणि भुगाव परिसरात घरफोडी केल्याची माहिती दिली. तसेच चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट दोनच्या पथकाने आरोपीला घेऊन पुणे शहर, देहु रोड, श्रीरामपूर, सोलापूर या भागात जाऊन त्याने गहाण ठेवलेले दागिने जप्त केले. पोलिसांनी 5 लाख 300 रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. आरोपीकडून भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आणि पौड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

आरोपीवर 104 पेक्षा अधिक गुन्हे…

अटक आरोपी अट्टल चोर असून, तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अभिलेखावर 104 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, गजानन सोनुने, कादीर शेख, समीर पटेल, नागनाथ राख, संजय जाधव, निखील जाधव साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();