अपहृत मुलगी अपहरणकर्त्यासह ताब्यात
पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : टीसीने दिले लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, बारामती येथील हद्दीतून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस आणि आरोपींस शिताफीने पकडण्यास पुणे लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले असून, सदर मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
बुधवारी २२ सप्टेंबर रोजी पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीस राजेंद्र रमेश पाटोळे (वय १८, रा. संगोबाची वाडी, कुरणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याने अल्पवयाचा फायदा घेऊन व कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत सदर मुलीची आई सुनीता राजेंद्र वर्ग, (वय ४५, रा. मु. पो. गोंदी, ता. घनसांगवी, जि. जालना, सध्या रा. संगोबाची वाडी, कुरणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, जि. पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची पळवून नेलेली मुलगी व यातील आरोपी हे गुरुवारी (२३ सप्टेंबर) न्यू भूज पुणे एक्सप्रेस गाडीमध्ये विनातिकिट मिळून आल्याने गाडीतील टीसीने त्यांना पकडून शिवाजीनगर लोहमार्ग पोलीस मदत केंद्र येथे आणून दिले असता शिवाजीनगर लोहमार्ग पोलीस मदत केंद्राकडील पोलीस नाईक शेख आणि चिले यांनी तसेच रेल्वे सुरक्षा बलाकडील निरीक्षक किरटकर, हवालदार मोरे यांनी चौकशी केली तसेच सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेकडेस गुन्हा दाखल असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून तेथील पोलिसांना व पळवून नेलेल्या मुलीच्या पालकांना पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे बोलावून घेऊन ती त्यांच्या ताब्यात दिली.
सदरची कामगिरी ही, प्रभारी पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कावळे, पोलीस नाईक इम्रान शेख, उदय चिले यांनी केली आहे.
सदर उत्कृष्ट कामगिरीबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलिसांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, बारामती येथील हद्दीतून पळवून नेलेल्या मुलीस आणि आरोपीस शिताफीने पकडले.
