आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिला पोलिसांना आता आठ तासांची ड्युटी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

27 सप्टेंबरपासून अंमलबजावणी : चार तासांचा कपात झाल्याने निर्णयाचे स्वागत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याबाबत सरकारने आदेश काढला असून पुणे पोलिस दलातील महिला अंमलदारांबाबत या निर्णयाची २७ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. ड्युटीमध्ये चार तासांचा कपात झाल्याने महिला कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


महिला पोलिसांना दैनंदिन काम गंभीर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अनेक वेळा जादा तास कार्यरत राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा नागपूर पोलिस आयुक्तालयात महिला पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयात आठ तास ड्युटीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतर शुक्रवारी सरकारने हा निर्णय राज्यातील महिला पोलिसांसाठी लागू केला आहे. त्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदोबस्त असल्यास अशा वेळी अतिरिक्त कर्तव्याची आवश्यकता असू शकते असेही आदेशात म्हटले आहे.


राज्य पातळीवर महिला पोलिसांसाठी आठ तास ड्युटीचा निर्णय घेण्यात आला असून चार तासांची ड्युटी कपात केल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. पोलीस दलात कर्तव्य बजावण्यासोबतच महिलांना कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यांची उकल करताना अनेक वेळा 12 तासापेक्षा जास्त कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. आता त्यांना ड्युटीमध्ये चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पुणे शहर दलामध्ये २७ सप्टेंबर २०२१ पासून सर्व महिला पोलीस अंमलदार यांचा कर्तव्य काळ हा आठ तासांचा राहील, असे आदेशित करण्यात आले आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदोबस्त (उदा. गणेशोत्सव, ईद, मोहरम, नवरात्र, ख्रिसमस, नववर्ष, डॉ. आंबेडकर जयंती, रामनवमी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन) इत्यादीवेळी अंमलदार यांच्याकडून अतिरिक्त कर्तव्याची आवश्यकता असल्याने त्यावेळी प्रभारी अधिकारी वरील नियमात अपवाद करू शकतील. परंतु याही दिवसांमध्ये सुविधात्मक दृष्टिकोन ठेवून महिला अंमलदारांच्या कर्तव्याच्या वेळा मर्यादीत ठेवण्याबाबत प्रयत्न करावा, असे आदेशात नमुद केले आहे.

याव्यतिरिक्त इतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये व तात्काळ उद्भवणा, या घटनांमध्ये महिला अंमलदारांच्या व कर्तव्याचा वेळ वाढविण्यासाठी संबंधित पोलीस उप आयुक्त निर्णय घेतील.

सदर आदेशानुसार कर्तव्य वाटप करताना स्थानिक स्तरावर कर्तव्याच्या वेळासंबंधी योग्य ती आखणी करावी. सदर आदेशाची योग्यप्रकारे बजावणी होत आहे, याबाबत संबंधित अपर पोलीस आयुक्त यांनी खात्री करावी.
-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

शहरातील १९४० कर्मचाऱ्यांना फायदा

मुंबईनंतर पुणे पोलिस आयुक्तालयाचा राज्यात क्रमांक लागतो. या ठिकाणी १९४० महिला पोलिस कर्मचारी आहेत. या सर्व महिला पोलिस अंमलदारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर महिला अंमलदारांनी निर्णयाचे स्वागत करून सरकारचे व पोलिस महासंचालकांचे आभार मानले.

get_footer();