आवृत्ती पुणे
← Back to Homepage

३५०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 12, 2022
Spread the love

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण : सायबर पोलिसांनी केली होती कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आरोग्य विभागाचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केली होती. म्हाडाच्या भरती परीक्षेअंतर्गत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन डॉ. प्रितिश देशमुख, एजंट अंकुश हरकळ, संतोष हरकळ या तिघांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात 3 हजार 500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण 6 जणांना अटक केली आहे. देशमुख व हरकळ बंधू यांच्याशिवाय जमाल इब्राहिम पठाण (वय ४७, रा. जळकोट, लातूर), कलीम गुलशेर खान (वय ५२, रा. बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी (वय-32 रा. बुलढाणा) आरोपींना अटक केली. म्हाडाचे वतीने गट अ,ब,क या पदांची परीक्षा घेण्यासाठी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीसोबत करार केला होता.

राज्यातील विविध शहरात तपास…
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचा तपास करत असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भातही सातत्याने माहिती समोर येत होती. यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी सांगितले की, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी काही लोक तयारी करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेऊन पथके तयार केली. पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे या ठिकाणी पथकांनी तपास केला. आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतले. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आढळली.

पोलिसांकडून तपास सुरु असताना सुरुवातीला औरंगाबाद मधील काही क्लासेस चालवणाऱ्या लोकांची भेट घेतली. त्यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या. यामध्ये आरोग्य भरतीच्या पेपर संदर्भातही माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आढळून आली. यात परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अडमीटकार्ड आढळून आले. यातून ही माहिती समोर आली. पुढे हरकळ ब्रदर्सपण यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितिश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. देशमुख याच्याकडे लॅपटॉप होता, तसेच काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. याशिवाय काही पेनड्राईव्ह मिळाले होते.

get_footer();