आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

एक वर्षासाठी केले स्थानबद्ध : तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर काढली होती रॅली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई-पुणे द्रितगती महामार्गावर रॅली काढली होती. या रॅलीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. गजा मारणेच्या रॅलीची व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पुण्यातील गुंडावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करुन त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

संतोष पांडुरंग तोंडे (वय-38, रा. सुतारदरा, कोथरुड, सध्या रा. खेचरे, ता. मुळशी) असे या गुंडाचे नाव आहे. संतोष तोंडे याने साथीदारांसह कोथरुड, हडपसर, तळेगाव दाभाडे, पोलीस ठाण्यात तसेच पुणे शहरात दुखापत, दरोडा तयारी, दंगा, खंडणी, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 15 वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 8 गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा तळोजा तुरुंगातून बाहर आल्यानंतर त्याची वाहनांच्या ताफ्यासह मोठी रॅली काढली होती. या रॅलीमुळे मुंबई-पुणे महामार्ग पूर्ण पणे ब्लॉक झाला होता. या रॅलीमध्ये संतोष तोंडे याच्यासह 200-300 साथिदारांनी सहभाग घेतला होता. त्याने मुळशी पॅटर्न चित्रपटातील डायलॉगची क्लिप तयार करुन ‘आला रे आला, तुमचा बाप आला’ अशा मजकुराची घोषणा करत ही क्लिप व्हायरल करुन जनतेमध्ये दहशत निर्माण केली.

कोथरुड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे व महेंद्र जगताप यांनी एनपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. पोलिस आयुक्तांनी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करुन संतोष तोंडे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या 10 महिन्यात 36 गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्ध केले आहे.

get_footer();