आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन एकरात गांजा लावण्यासाठी शेतकऱ्याने मागितली परवानगी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021
Spread the love

जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अर्ज : इतर पिकांना हमीभाव नसल्याने केली मागणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क


सोलापूर : इतर पिकांना हमीभाव नसल्यामुळे तोट्यात असलेल्या शेतीसाठी एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जमिनीवर चक्क गांजा लावण्याची रीतसर परवानगी मागणारा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला असून, या परवानगीसाठी दि. १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या अजब अर्जाची आता सर्वत्र जोरदार चर्चा होत असून, हा अर्ज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायलर होत आहे.

अनिल आबाजी पाटील (रा. शिरापूर (सो), ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने स्वतःच्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी दयावी, अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे.


पाटील यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, मी शेतकरी असून कोणतेही पीक केले तरी त्याला शारसनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्चदेखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता, त्याचेदेखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमूद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दि. १५ सप्टेंबरपर्यंत लेखी परवानगी दयावी, अन्यथा मी १६ सप्टेंबर या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली, असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील.

get_footer();