आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा : विरोधकांनी भाजप व प्रशासनाला धरले धारेवर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन कामे झाल्याची दाखवून पुणे महापालिकेची ९९ लाख 8 हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी या विषयावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी प्रल्हाद पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश चंद्रशेखर मोरे (रा. गणेश पार्क, सिंहगड रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते २१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.
पुणे महापालिकेच्या बाणेर, कोथरुड तसेच नवी पेठेमधील वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युत विषयक कामे केल्याचे एकूण 99 लाख 8 हजार रुपयांची खोटी बनावट बिले तयार करुन ती खरी आहेत, असे भासविले.

मनपाचे सर्वसाधारण बिल फार्म तयार करुन संबंधित पूर्व परवानगी व शिफारसी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्के मारुन परस्पर कार्यालयीन जावक करुन आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी ही खोटी बिले पाठविली. ही बिले मंजूर करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना काळात विना निविदा एक कोटी रुपयांचे काम झाल्याचे दाखवून त्याचे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. याप्रकरणी मुख्य सभेत गुरुवारी आंदोलनही करण्यात आले. विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल. फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले होते. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

get_footer();