आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणारा पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : २१ मोबाईल हँडसेट, मोपेडसह एक लाख ८८ हजारांचा ऐवज जप्त

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल हँडसेट, होंडा कपनीची मोपेड असा एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

तानाजी शहाजी रणदिवे (वय ३३, रा. शांतीनगर, साईबाबा मंदिराजवळ, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपासी पथक गस्त घालत होते, त्यावेळी महावीर गार्डनजवळील गंगाधाम रस्त्यावर चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक व्यक्ती आल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयावरून त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल मिळून आले.

त्याची अधिक चौकशी केली असता, तो पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी करीत असून, कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी मार्केट यार्ड परिसरात मोबाईल चोरून विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून २१ मोबाईल हँडसेट व गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची मोपेड असा एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षिका अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखआली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, सहायक पोलीस फौजदार मते, पोलीस अंमलदार सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी व राहुल शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();