आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भेसळयुक्त ताडीची विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 24, 2022
Spread the love

पोलीस आयुक्तांची एमपीडीए कायद्यान्वये ५७ जणांवर कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासायनिक भेसळयुक्त ताडीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल ५७ जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

अनिल व्यंकटेश भंडारी (वय २५, रा. गिरीराज चौक, सुतारवाडी, पाषाण) असे एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अनिल भंडारी याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याने त्याच्या साथीदारांसह चतु:श्रृंगी पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे भेसळयुक्त ताडी विक्री केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यास, जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आरोपीची या भागात दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अनिल भंडारी याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 57 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

get_footer();