आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने वृद्धेला एक लाखाला फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

समर्थ पोलिसांत फिर्याद : खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वृद्ध महिलांना गाठून त्यांना तुम्हाला पेन्शन लागली असल्याची बतावणी करुन सरकारी कार्यालयातून पेन्शन मिळवून देतो, त्यासाठी अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगून तुमचा नंबर लावून येतो, असे सांगून दागिने घेऊन चोरटा पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ए. डी. कँम्प चौकातील खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली.

याप्रकरणी हडपसर येथे राहणार्‍या एका ७२ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील ७२ वर्षाच्या महिला ए. डी. कॅम्प येथे असताना एकाने त्यांची ओळख काढली. त्यांची विचारपूस करुन तुमच्या मुलांना ओळखतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना तुम्हाला पेन्शन लागली आहे. ती मिळवून देतो, असे सांगून त्यांना रिक्षातून खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत आणले. तेथे त्याने दागिने पाहून तुम्हाला पेन्शन देणार नाहीत, असे सांगून अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे या महिलेने त्यांच्या अंगावरील १ लाख २ हजार रुपयांचे ४१ ग्रॅम वजनाचे दागिने काढून पिशवीत ठेवले. त्यानंतर चोरट्याने त्यांना तुमचा नंबर लावून येतो, तुम्ही इथेच थांबा, असे सांगितले. दागिने ठेवलेली पिशवी घेऊन तो कार्यालयात गेला व तेथून पळून गेला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. परंतु, कोठे तक्रार करावी याविषयी त्यांना काही कल्पना नव्हती. शेवटी त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जोरे तपास करीत आहेत.

get_footer();