नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासरे कुसाळकर अटकेत
विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई : छळाला कंटाळून नवविवाहितेने केली होती आत्महत्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : नवविवाहितेला मारहाण व शिवीगाळ करुन छळ केल्याने व या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पती व सासर्याला अटक केली आहे.
रामण्णा सुरेश कुसळकर (वय २४) आणि सुरेश धोंडिबा कुसळकर (वय ५५, दोघे रा. माधवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासु सरुबाई सुरेश कुसळकर (वय ५०) आणि दीर महादेव सुरेश कुसळकर (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पार्वती महादेव दंडगुले (वय ५५, रा. लातूर) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची मुलगी करुणा (वय २०) हिचे रामण्णा कुसळकर याच्याबरोबर ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न झाले होते. नंतर सासरी नांदत असताना तिला आरोपींनी वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण केली. शारिरीक व मानसिक त्रास देऊन छळ केला. या छळाला कंटाळून करुणा हिने २५ डिसेंबर रोजी धानोरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ते त्यावेळी तक्रार देण्यास येऊ शकले नव्हते. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.
