आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मंडप व्यावसायिकाला 12 लाखांना गंडविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2022
Spread the love

पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात : ऑनलाइन खाते निघाले बनावट

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : मंडप व्यावसायिकाला स्वस्तात पोलाद देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 12 लाखांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत.

इरफान उर्फ इशान अब्दुल रेहमान खान (वय – 38 रा. भगतसिंहनगर, गोरेगाव, मुंबई), हितेश नंदकुमार मिस्त्री (वय – 45 रा. भाईंदर, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांचा मंडप व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात साहित्याची गरज असल्याने त्यानी ऑनलाईन अ‍ॅपवर माहिती घेतली. त्यानंतर आरोपी शेख याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून दलाल राजेश शहा बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला स्वस्तात पोलाद मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी शेखने त्यांच्याकडून माल खरेदीची आगाऊ माहितीपत्र मागवून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना आदिनाथ मेटल्स नावाने असलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने 12 लाख 4 हजार रुपये बँक खात्यात जमा केले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर पोलाद न मिळाल्याने फिर्यादी यांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी खात्यातील तपशील नाव बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला असता, आरोपी शेख हा गोरेगाव भागात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून बनावट कागदपत्रे, शिक्के, दोन मोबाईल जप्त केले. तपासामध्ये शेखने मिस्त्रीच्या पत्नीच्या बँक खात्याचा वापर केल्याचे समोर आले. याप्रकरणात पोलिसांनी शेख, मिस्त्री आणि रोनक मेहता (वय – 37 रा. वाळकेश्वर, मुंबई) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मेहता आजारी असल्याने त्याला नोटीस बजावली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, नितीन चांदणे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();