मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून पाच मोटारी, दोन मोबाईल असा एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
विशाल ऊर्फ बिच्या गोटुराम काळे (वय १९, रा. चिखली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अजय सुनील भोसले (वय २१, रा. धनेगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, दोघेजण दोन मोटारसायकल घेऊन नान्नज (मार्डी, व्हनसळ) वरून उस्मानाबादकडे विक्री करण्यास जाणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोलापूर-तुळजापूर रोडवरील व्हनसळ फाटा येथे सापळा रचून संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकल चोरी करून उस्मानाबाद येथे विक्री करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि मोटारसायकल ताब्यात घेऊन दोघांना अटक केली. त्यावेळी आणखी एक साथीदार तीन मोटारसायकल घेऊन येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यालाही ताब्यात घेऊन तिन्ही मोटारसायकल ताब्यात घेऊन कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. आरोपींवर सोलापूर तालुका, अक्कलकोट उत्तर, पंढरपूर तालुका व कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून, विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
