आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फोन पे द्वारे नऊ सराफांना गंडविणाऱ्यास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 26, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांची कारवाई : आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करुन पैसे फोन पे द्वारे दिल्याचे भासवून 9 सराफांची फसवणूक करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार 24 जानेवारी 2022 रोजी घडला होता.

विशाल माणीक घोडके (वय-28 रा. होलेवस्ती, होले बिल्डींग, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रामेश्वर नंदलाल वर्मा (रा. अ‍ॅमनोरा टाऊनशिप, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानातून 5 ग्रॅम 480 मिली वजनाची अंगठी घेऊन त्यांची फसवणूक केली होती. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, सुरज कुंभार यांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पुणे शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे सांगितले.

गुन्हा करण्याची पद्धत…

आरोपी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दागिने पाहून ते दागिने खरेदीच्या वेळेस मोबाईलमधील फोन पे या पेमेंट अ‍ॅप्लिकेशन मधून सोनाराच्या दुकानातील पेमेंट अ‍ॅपचे स्कॅनर स्कॅन करुन पेमेंट फेल झाल्याचा स्क्रीन शॉट काढत होता. त्यानंतर स्कीन शॉट क्रॉप करुन दुकानदाराला फेल स्क्रीन शॉट वरील युटीआर क्रमांक देऊन पेमेंट झाल्याचे भासवून दागिने घेऊन जात होता. काही वेळा दुकानदाराला पेमेंट न झाल्याने त्यांनी दागीने देण्यास नकार दिला असेही त्याने सांगितले.

50 पेक्षा जास्त जणांचा फसवणूकीचा प्रयत्न…

आरोपीने एडीट केलेल्या स्क्रीन शॉटवरुन आतापर्यंत सुमारे 14 लाख रुपयाहून अधिक ट्रांन्जेक्श करुन 50 पेक्षा अधिक दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

9 गुन्हे उघड 8 लाखांचा मुद्देमाल जप्त…

आरोपीने हडपसर, वानवडी, चंदननगर, भारती विद्यापीठ, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह एक सेलेरिओ कारचा समावेश आहे. आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार, प्रशान टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुमार यांचे पथकाने केली आहे.

get_footer();