आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्र. ४१चा दीक्षान्त संचलन समारंभ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 15, 2021
Spread the love

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उपस्थिती : प्रशिक्षणार्थींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

दौंड : पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्र. ४१चा दीक्षान्त संचलन समारंभ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी प्रशिक्षणार्थींना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे सत्र क्र. ४१ चा दीक्षान्त संचलन समारंभ प्रमुख अतिथी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, यांच्या उपस्थितीत पार पडला. दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी सौरभ कोलते यांनी केले. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संदीप आटोळे यांनी या प्रशिक्षणाबाबतचे अहवाल वाचन करून संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.
सदर संचलन समारंभास राज्य राखीव पोलीस बल गट क्र.०५ दौंडचे समादेशक तानाजी चिखले, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, दौंडचे संग्राम डांगे, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे शाखा अभियंता संजय गित्ते, तसेच दौंड शहरातील शौर्य ॲकॅडमीचे छात्र, पत्रकार बांधव व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख अतिथींनी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. प्रशिक्षणार्थीचे दिमाखदार संचलन, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथे राबविलेले विविध उपक्रम, व्हर्चुअल क्लासरूम, आईडीपार्क, मॉडेल पोलीस स्टेशन, ट्रॅफिक पार्कचे आधुनिकीकरण व नव्याने शिकविण्यात आलेले भावनिक प्रज्ञावंत पोलीस इत्यादी उत्कृष्ट कामकाजाबाबत प्राचार्य संदीप आटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले, तसेच रक्तदान शिबिर, विविध वृक्षांची लागवड इत्यादी पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविल्याने संस्थेच्या कामकाजाबद्दल कौतुक केले. पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज येथे कृतिशील प्रयोगाच्या माध्यमातून तयार झालेला अष्टपैलू पोलीस कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान नक्कीच उंचावेल व पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला साजेसे वर्तन ठेवेल,असा विश्वास व्यक्त केला.

अष्टपैलू प्रथम म्हणून विशाल जगताप (बीड), अष्टपैलू द्वितीय शाम माने (नांदेड), आंतरवर्ग प्रथम आकाश बिराजदार (लातूर), गोळीबार प्रथम क्रमांक महादेव गोयकर (जळगाव), बेस्ट टर्न आऊट सौरभ कोलते (जळगाव), उत्कृष्ट खेळाडू सुनील यादव (गोंदिया) या प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथी कृष्ण प्रकाश यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे या प्रशिक्षण सत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रशिक्षण केंद्रास विशेष साहाय्य करणाऱ्या शासनाच्या अन्य विभागाचे अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, दौंडचे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणेचे शाखा अभियंता संजय गित्ते यांना अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सत्र क्र. ४१ मधील स्मृतींना उजाळा देणारी ‘स्मृतिगंध’ ही स्मरणिका प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली.
उपप्राचार्य एच. पी. मुलाणी यांनी प्रमुख अतिथी, पत्रकार व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

get_footer();