आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रेमीयुगुलाला मारहाण करुन फोनपेद्वारे ७६ हजार रुपये लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

पाषाण टेकडीवर फिरायला गेल्यानंतर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पाषाण टेकडीवरील सुसखिंडित फिरायला गेलेल्या जोडप्याला तिघा चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. चोरट्यांनी जोडप्याला बेदम मारहाण करुन त्यांच्या बँक खात्यातून फोन पेद्वारे जबरदस्तीने 76 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले.

सुसखिंडीत फिरायला येणाऱ्या जोडप्यांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या चिंचवडमधील ३४ वर्षाच्या युवकाला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी या जोडप्याकडून एक लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. तर एका तरुणाला पोलीस असल्याची बतावणी करुन मारहाण करत लुटले होते. हा प्रकार एप्रिल २०१९ मध्ये घडला होता. यानंतरची ही तिसरी घटना आहे.

याप्रकरणी पिंपरीतील नेहरुनगर येथील एका 25 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक व त्याची मैत्रिण पाषाण येथील डोंगरावर फिरायला आले होते. तेथे दोघेजण एकांतात बसले होते. त्यांच्या जवळ अचानक तिघेजण आले. त्यांनी तुम्ही कुठले, इथे काय करता असे म्हणत मारहाण केली. यानंतर या जोडप्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी युवकाच्या बँक खात्यातून 40 हजार तर त्याच्या मैत्रिणीच्या बँक खात्यातून 36 हजार असे एकूण 76 हजार रुपये फोन पे द्वारे ट्रान्सफर करुन घेतले. पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव अधिक तपास करीत आहेत.

get_footer();