आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर मोक्का

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 26, 2022
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई : गुन्हेगारांना बसतोय चाप

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 72 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

समीर शबीर शेख (वय २७) व त्याचा साथिदार शकिल शबीर शेख (वय २७, दोघे रा. एकता नगर येरवडा) अशी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

आरोपींची विमानतळ, येरवडा, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत आहे. आरोपींविरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व परिसरात दहशत पसरवण्यासाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, दुखापत, घरफोडी अशी गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ रोहिदास पवार यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्तांची ७२ वी मोक्का कारवाई…

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात ९ तर, आजपर्यंत ७२ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव, सर्वेलन्स पथकातील पोलीस हवालदार उमेश धेंडे, पोलीस नाईक पीसाळ, सुर्या यादव, महिला पोलीस अंमलदार धुमाळ यांच्या पथकाने केली.

get_footer();