वरिष्ठ अधिकार्याकडून ३१ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार
हडपसर पोलिसांत गुन्हा : लग्नाच्या आमिषाने वारंवार ठेवला शारीरिक संबंध
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत वरिष्ठ पदावर असल्याचा फायदा घेऊन तरुणीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार शारिरीक अत्याचार करत बलात्कार केला. ही घटना मांजरी, खराडी, पुणे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून ते ११ जून २०२१ दरम्यान घडली.
हडपसर पोलिसांनी राहुलकुमार सिंग (वय ३७, रा. खराडी) आणि मालव आचार्य (वय ३०, रा. अहमदाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अहमदाबाद येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या पुण्यातील कंपनीत कामाला असताना राहुलकुमार हे तिचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी पदाचा फायदा घेऊन फिर्यादीसोबत फोनवर संपर्क वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी हिला वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार नेऊन शारिरीक संबंध ठेवले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा मालव आचार्य याच्या मदतीने तिचे राहते ठिकाणी तसेच कंपनीमध्ये तिची बदनामी केली. फिर्यादीचा मानसिक छळ करुन तिला पुण्यातील राहते घर सोडायला लावून अहमदाबादला परत जाण्यास भाग पाडले. तू पोलिसांकडे तक्रार दिली तर तुझ्यावर रेप करायला लावील, तुझ्या घरच्यांचा अपघात करील आणि कोणी केला ते पण समजणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादी यांना धक्काबुक्की केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.
