हॉटेलमध्ये घुसून चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
चंदननगर पोलिसांत फिर्याद : खराडी-चंदननगर परिसरातील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पाण्याची बाटली, सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने हॉटेलमध्ये शिरुन मारहाण करुन मोबाईल व रोकड चोरुन नेणार्या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत मधुकर जगताप (वय २६) आणि अन्वर मोईद्दीन शेख (वय ३५, दोघे रा. थिटेनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी मनिष प्रदीप सिंग (वय २८, रा. ग्रीन क्रीस्ट सोसायटी, भेकराईनगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांचे खराडी गावातील रोडवर टेस्टी पॉईट नावाचे चायनीज हॉटेल आहे. शुक्रवारी दुपारी ते हॉटेलमध्ये असताना प्रशांत जगताप, अन्वर शेख हे त्यांच्या दोन साथीदारांसह आले. त्यांनी पाण्याच्या बाटल्या व सिगारेट उधार मागितल्या. फिर्यादी यांनी उधार देण्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. बॅटने व खुर्चीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल व ७ हजार ९०० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
