आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘त्या’ प्रकरणात भाजप नगरसेवक धनराज घोगरेंसह चौघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने ठेकेदाराकडून तीन लाख रुपये घेऊन एका भाजप नगरसेवकाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर पैसे घेऊनदेखील काम न दिल्याने पैशांची मागणी ठेकेदाराने केली असता त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धनराज घोगरे, सुरेश तेलंग (दोघे, रा. हेवन पार्क, वानवडी), विनोद माने पाटील, गुड्डू (दोघे. रा. वानवडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखील रत्नाकर दिवसे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दिवसे आणि त्यांचे मित्र विक्रांत कांबळे हे भागीदारीमध्ये ठेकेदारीचा व्यवसाय करतात. ते शौचालय, ड्रेनेज, डांबरीकरण इत्यादी कामे करतात. मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये फिर्यादी यांची निखील बहीरट या मित्राने प्रभाग 25 चे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासोबत ठेकेदारीबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी त्यांना प्रभाग 25 मधील कामे देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नगरसेवक घोगरे यांच्या शिवरकर रस्त्यावरील कार्यालयात झालेल्या भेटीमध्ये ‘माझ्या प्रभागातील कामे देतो, मला तीन लाख रुपये द्यावे लागतील’, असे फिर्यादी दिवसे यांना सांगण्यात आले. त्यानंतर दिवसे यांनी नगरसेवकांच्या साथिदारांना तीन लाख रुपये दिले. परंतु पैसे देऊन देखील नगरसेवकांनी काम दिले नाही असे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, काम न मिळाल्याने फिर्यादी दिवसे यांनी दिलेले तीन लाख रुपये परत मागितले. त्यावेळी नगरसेवक आणि त्यांच्या साथिदारांनी त्यांना मारहाण करुन पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी दिवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी भाजप नगरसेवकासह चार जणांवर फसवणूक, मारहाण इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();