विनयभंगप्रकरणी एक अटकेत, तर एकावर गुन्हा
पोलिसांत फिर्याद दाखल : 32 वर्षीय महिलेशी अश्लील भाषा, तर 29 वर्षीय तरूणीचा विनयभंग
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अलीकडे भररस्त्यात पायी जाणार्या महिलांना धक्का देऊन त्यांना शुक शुक करणे, अचानक त्यांच्या कंबरेला हात घालून लज्जास्पद वर्तन करण्याचे प्रकार पुणे शहरात सर्रास होऊ लागले आहेत. त्यापैकी काही महिला, तरुणी पुढे येऊन तक्रार करीत असून अनेक जणी सर्वांसमोर होणारा हा प्रकार मुकाट्याने सहन करताना दिसून येत आहे. त्यामुळे भामट्यांची हिंमत वाढली आहे. महिलांनी अन्याय सहन न करता थेट विरोध करीत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
वडगावशेरीत राहणार्या एका 32 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद पांडुरंग दामोदरे (वय 38, रा. वडगावशेरी) याला वडगावशेरी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रविवारी (दि.13) सायंकाळी भाजी आणण्यासाठी पायी जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आला व त्यांना पाठीमागून धक्का देऊन निघून गेला. भाजी घेऊन फिर्यादी या परत घरी जात असताना त्याने फिर्यादीकडे पाहून शुक शुक असा आवाज दिला. तुला लायसन्स पाहिजे असेल, तर पुढार्यांकडे जायचे त्यांच्याकडे रात्रभर…, त्यानंतर लगेच लायसन्स भेटते, असे म्हणून त्यांचा भर रस्त्यात विनयभंग केला.
दुसरी घटना खडकीतील मुळा रोडवरील दुर्गा माता मंदिराजवळ शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या तरुणीने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिासांनी राहुल धरमपाल यादव व सचिन धरमपाल यादव (रा. खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या पायी घरी जात असताना त्यांच्या येथे राहणारा राहुल यादव हा अचानक समोरुन आला व त्याने फिर्यादीच्या कंबरेत हात घालून लज्जास्पद वर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला जाब विचारल्यावर त्यांनी चिडून जाऊन फिर्यादीच्या घरी येऊन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.
