आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना जाळ्यात

पुणे : ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला ग्रामपंचायत अधिकार्यास रंगेहाथ पकडले.

निर्मला कैलास भुजबळ (वय ४४, रा. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत भांबर्डे, ता. शिरूर) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत एका ३७ वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराने २०२०-२१ मध्ये भांबर्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवले होते. त्या कामाच्या बिलाचा मोबदला तसेच अंगणवाडीत लावलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी एकूण ११ लाख रुपयांचे बिल झाले होते.

त्यापैकी काही रक्कम तक्रारदाराला मिळाली होती. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत अधिकारी निर्मला भुजबळ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी भुजबळ यांनी उर्वरित बिलाचे चेक काढण्यासाठी एकूण बिलाच्या ६ टक्के म्हणजेच ६० हजार रुपयांची लाच मागितली.

त्याबाबतची तक्रार २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी १, ३ व १५ एप्रिल रोजी करण्यात आली. भांबर्डे ग्रामपंचायतीच्या पेव्हर ब्लॉक कामाच्या बिलासाठी १० हजार आणि अंगणवाडीतील कामाच्या बिलासाठी ५० हजार अशा एकूण ६० हजार रुपयांची लाच निर्मला भुजबळ यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार २८ एप्रिल रोजी भांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच घेताना निर्मला भुजबळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम व मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विरनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

get_footer();