आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

पुणे : गुंडाच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला गेल्या वर्षी २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असताना बिबवेवाडी परिसरात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ताऊ ऊर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय २८, रा. शेळके वस्ती, अप्पर बिबवेवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी अविनाश जोगन याला १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही त्याने कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात प्रवेश केला.

अपर बिबवेवाडी परिसरातील शेळके वस्ती येथे १६ एप्रिल रोजी त्याने हवेत शस्त्र फिरवून दहशत पसरवली. पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अविनाश जोगन हा दहशत पसरवत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक तातडीने तेथे पोहोचले आणि त्यांनी अविनाश जोगन याला ताब्यात घेतले. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, दत्ता शेंद्रे यांनी पार पाडली.

get_footer();