आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपी वाहक महिलेवर चालत्या बसमध्ये चाकू हल्ला

पुणे : बसमध्ये शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला “शिव्या देऊ नको, नाही तर खाली उतर,” असे सांगितल्याने त्या तरुणाने महिला वाहकावर धावून जात चाकूने त्यांच्या मांडीवर वार केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८, रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड) या जखमी झाल्या आहेत. बंडगार्डन पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे स्टेशन येथील अलंकार चौकात १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस १५ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून निघाली होती. त्या वेळी भालेराव प्रवाशांचे तिकीट काढण्याचे काम करत होत्या.

त्या वेळी एका प्रवासी तरुणाला त्यांनी तिकीट काढण्यास सांगितले. या कारणावरून त्या तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन तो त्यांच्या अंगावर धावून गेला आणि चाकूसारख्या हत्याराने त्यांच्या मांडीवर वार करून बसमधून उडी मारून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

get_footer();