आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीत मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण, दोन मंडळांवर गुन्हे दाखल

बार्शी : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व सोलापूर जिल्हाधिकारी, एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहरातील दोन जयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरातील सर्व जयंती उत्सव मंडळांची पूर्वबैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय यांच्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना व नोटीस देण्यात आल्या होत्या. याशिवाय जिल्ह्यात “नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर लाईट” अशी बंदी लागू केल्याचेही सर्व मंडळांना कळविण्यात आले होते.

दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये विविध वाद्यांचा वापर करण्यात आला. मात्र काही मंडळांकडून डीजे/डॉल्बी लावण्यात आल्याने आवाजाची पातळी (डेसिबल) मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे नॉईज लेव्हल मशीनद्वारे आढळून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण निर्माण झाले.

या प्रकरणी कारवाई बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी करत ध्वनी पातळी मोजणी केली व नियमभंग सिद्ध झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे नोंद केले. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी भीम गर्जना मित्र मंडळ, सोलापूर रोड, बार्शी तसेच विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ, बार्शी यांच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित डीजे/डॉल्बी मालक, ऑपरेटर, वाहनचालक आदींवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम २२३ व ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

get_footer();