शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
सायबर चोरट्यांच्या आमिषाला ज्येष्ठांसह तरुणही पडत आहेत बळी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ८.१८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सायबर चोरट्यांनी आधी थोडा परतावा देत विश्वास संपादन केला आणि नंतर मोठी फसवणूक केली.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका ३३ वर्षीय तरुणाची तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणारा आहे. गेल्या वर्षी सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइलवर शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळेल, असा मेसेज पाठवला होता.
त्यानंतर त्याला एक अॅप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले गेले आणि त्या अॅपद्वारे गुंतवणूक योजनांची माहिती देण्यात आली. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरत एकूण ८.१८ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देत चोरट्यांनी त्याचा विश्वास संपादन केला. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवल्यानंतर परतावा थांबवण्यात आला. अखेर पैसे मागितल्यावर चोरट्यांचे मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले.
यानंतर तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सायबर चोरट्यांच्या फसवणुकीला रोज अनेक नागरिक बळी पडत असून, यात तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होत आहे.
