आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Spread the love

पुणे : स्वारगेट परिसरात आलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला पकडून पोलिसांनी ६ किलो गांजा जप्त केला. त्याच्याकडील चौकशीतून पोलिसांच्या विशेष पथकाने पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथून त्याचे साथीदार पकडले. त्यांच्या ताब्यातून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी व मोबाइल फोन असा एकूण १६ लाख ४६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापूर, जि. सोलापूर), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१, रा. आंबेडकरनगर, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार राहुल होळकर आणि विक्रम सावंत यांना माहिती मिळाली की, स्वारगेट बस स्टँड येथे दाढी राखलेला, मानेवर इंग्रजीत टॅटू काढलेला, डोक्यावर काळी टोपी व काळी पँट घातलेला एक तरुण वेळापूरला जाण्यासाठी बस पकडण्यास थांबला आहे आणि त्याच्याकडे गांजासारखा अंमली पदार्थ आहे.

या खबरीनुसार पोलीस अंमलदारांनी स्वारगेट बस स्टँडवर शोधमोहीम हाती घेतली. पंढरपूर बस स्टॉपवर त्याला गाठून बॅगेबाबत विचारणा केली असता नितीन पाल बॅग टाकून पळू लागला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या बॅगेत गांजा मिळून आला.

अधिक चौकशीत त्याने अल्ताफ तांबोळी व विठ्ठल शिवपाल यांच्या मार्फत हा माल विक्रीसाठी पुण्यात आणल्याचे सांगितले. उर्वरित साठा इनोव्हा क्रिस्टा गाडीत ठेवला असल्याचीही माहिती त्याने दिली. पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली. तिघेही चालक म्हणून काम करतात.

सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी विशेष पथक तयार केले. पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख व सुजय पवार यांनी वेळापूर भागात आरोपींच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तिन्ही आरोपींना शोधून काढले.

या कारवाईत १ लाख २१ हजार रुपयांचा ६ किलो गांजा, १५ लाख रुपयांची इनोव्हा क्रिस्टा गाडी आणि २५ हजार रुपयांचे तीन मोबाइल असा एकूण १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे, पोलीस हवालदार प्रीती मोरे, सुजाता दांगट, सहायक फौजदार राजेश गोसावी व विजय लोयरे यांनी केली आहे.

get_footer();