आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अटक न करण्यासाठी लाच मागणारा पोलिस अंमलदार जाळ्यात

Spread the love

पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदाराला रंगेहात पकडले. तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ बापू महारनवर (वय ३४, रा. ओम नमो रेसिडेन्सी, शेवाळवाडी, ता. हवेली) असे पोलिस अंमलदाराचे नाव आहे. युवराज कृष्णा फरांदे (वय ५९, रा. स्वप्नपूर्ती बंगला, वृंदावन सोसायटी, उरुळी देवाची) असे सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी विभागाने सापळा लावला असता महारनवर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार व त्यांचे घरमालक हे वीज चोरीच्या गुन्ह्यात आरोपी होते.

त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी यापूर्वीच महारनवर यांनी ५ हजार रुपये घेतले होते. मात्र, या रकमेबाबत चर्चा झाल्याने महारनवर यांनी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून “जे ५ हजार रुपये तू मला देणार होतास, ते तू तुझ्या घरमालकाला नेऊन दे” असे सांगत लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच या लाच मागणीस फरांदे यांनी फोनद्वारे प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. तक्रारदार व त्यांचे घरमालक यांना पोलीस ठाण्यात बोलावून, तक्रारदारास त्यांच्या घरमालकास ५ हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारदाराच्या घरमालकाकडून ५ हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहात पकडले गेले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन भोसले आणि असावरी शेडगे यांनी केली. पोलीस निरीक्षक असावरी शेडगे पुढील तपास करत आहेत.

get_footer();