आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

Spread the love

पुणे : भाजीपाला विक्रेत्यावर अदखलपात्र (एन.सी.) गुन्ह्यात कारवाई न करता मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदाराला कारवाईचा संशय आल्याने सापळा कारवाई होऊ शकली नाही.

विकास लक्ष्मण ओमासे (वय ३९, रा. आनंदबाग सोसायटी, सोनारी रोड, सासवड) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचा सासवड येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता.

त्या प्रकरणात कारवाई न करता मदत करण्यासाठी पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी २४ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने ३ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी विकास ओमासे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सासवड पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.

पैसे देण्यासाठी तक्रारदार तेथे गेले असता पोलीस हवालदार विकास ओमासे यांना संशय आला. त्यांनी तक्रारदाराला खोलीमध्ये नेऊन कपडे काढायला लावले. त्यामुळे प्रत्यक्ष सापळा कारवाई करता आली नाही.

मात्र, ओमासे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकास ओमासे यांना ताब्यात घेऊन सासवड पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास हट्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत.

get_footer();