आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या ‘नशा बार’ ला सील

Spread the love

पुणे : वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये दारू पिऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरातील तब्बल २२ वाहनांची तोडफोड केली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत वडगाव येथील ‘नशा बार’ सील केला. या अल्पवयीन मुलांना दारू विकल्याबद्दल बारच्या चालक, मालक आणि मॅनेजरसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड आणि दहशत माजवण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत.

मात्र, अशा प्रकारची कठोर कारवाई प्रथमच करण्यात आली आहे. वडगाव बुद्रुक येथील ‘नशा बार’चे चालक, मालक, तसेच मॅनेजर अनिल विनायक सूर्यवंशी, बार काउंटरवरील विनोद दत्ता कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी, मुलाचे वडील धर्मा सरोदे आणि दुसऱ्या मुलाची आई अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोडवरील तुकाईनगर येथे ज्ञानेश संकपाळ याला चौघा जणांनी मारहाण करून जखमी केले होते. या टोळक्याने तेथील २२ गाड्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणात साई उमाप याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चौकशीत या मुलांनी दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून ‘नशा बार’मधूनच त्यांना दारू मिळाल्याचे उघड झाले. अल्पवयीन असताना वाहन चालविल्यामुळे त्यांच्या आई – वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();