आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा १२ दिवसांनंतरही मोकाट

सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणारा गुन्हेगार १२ दिवस उलटूनही पकडण्यात कोरेगाव पोलिसांना यश आलेले नाही. कोरेगाव पोलीस त्याचा शोध घेत असून, ते दोघे पुण्यातील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत.

कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी आतिश मुकुंद जावळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मुलीला आतिश जावळे याने ११ मार्च रोजी रात्री पावणे नऊ वाजता जबरदस्तीने पळवून नेले.

आतिश जावळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध कोणतीही ठोस व प्रभावी कायदेशीर कारवाई केलेली नाही. अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती तत्पर कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे.

ही अल्पवयीन मुलगी क्लासला जात असताना आतिश जावळे हा एकतर्फी प्रेमातून तिला, “तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकेन,” अशी वारंवार धमकी देत होता. त्याबद्दल माहिती मिळाल्यावर फिर्यादींनी जावळे याच्या लहान बहिणीला फोन करून आतिश जावळे त्रास देत असल्याचे सांगितले होते.

याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सांगितले की, आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा शोध घेतला जात आहे. आरोपी चलाख असून ते दोघेही मोबाईल वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शोधामध्ये अडचणी येत आहेत.

दोघांचा शोध सुरू असताना तांत्रिक विश्लेषणावरून ते पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने पुण्यात शोध घेतला. तेव्हा एका पेट्रोल पंपावर त्यांनी मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरले. त्या वेळी मुलीने त्याचे पैसे दिल्याचे तेथील सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. पुण्यातून ते आता दुसरीकडे गेल्याचे समजून येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

get_footer();