आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आंदेकर टोळीने १२ वर्षांत गोळा केली २० कोटींहून अधिक खंडणी

Spread the love

पुणे : गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील मासे व्यापार्‍यांना धमकावून, गेल्या १२ वर्षांत आंदेकर टोळीने तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडु आंदेकरसह १२ जणांवर खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, संघटीतरीत्या गुन्हे करणे या अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील टोळीयुद्धाविरुद्ध केलेल्या सक्षम व कठोर कारवाईमुळे, दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरिकांमध्ये अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे.

या कारवाईमुळे मनोबल वाढल्याने, एका तक्रारदाराने गेल्या १२ वर्षांपासून बंडु आंदेकर टोळीचा दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली चालू असलेला खंडणी उकळण्याचा प्रकार उघड केला आहे.

या खंडणी प्रकरणात बंडु आंदेकर टोळीने आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त रक्कम मासे व्यापार्‍यांकडून व्यवसायासाठी जागा व इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून उकळल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी अक्षरशः कर्जबाजारी झाले असून, बंडु आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास व दहशतीमुळे ते सर्व प्रकार निमूटपणे सहन करत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध आक्रमक व कठोर कारवाई सुरू केली आहे.

याआधी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नागरिकांनी कोणत्याही दहशतीला न घाबरता, होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव पुढील तपास करत आहेत.

get_footer();