आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

Spread the love

पंढरपूर : आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सविस्तर आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

पंढरपूरमध्ये ६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग, सुरक्षित वाळवंट क्षेत्र, आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी त्यांनी सांगितले की, उजनी व वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने चंद्रभागा नदीत पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पातळीपर्यंत पाणी आल्यानंतर स्नानासाठी वाळवंट शिल्लक राहील याचा तातडीने अभ्यास करून आराखडा सादर करावा.

त्याचप्रमाणे, पालखी मार्गावर व शहरात झालेली अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अनधिकृत होर्डिंग्सवर त्वरीत कारवाई करावी आणि अधिकृत होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

कोणत्याही होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. नगरपालिकेच्या तसेच खासगी बोअरवेलमार्फत वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा.

नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावावेत, तसेच अन्न व औषध प्रशासनाने यात्रा काळात अन्नपदार्थ व प्रसाद विक्री करणाऱ्या दुकांनांची नियमित तपासणी करावी. मठ व धर्मशाळांमध्ये बनणाऱ्या अन्नपदार्थांचीही तपासणीसाठी पथके नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता पालखी तळांवर मुरमीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप, जर्मन हँगर, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या, सुलभ शौचालयांची उपलब्धता व त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष वाहने आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था करण्यात येत आहे.

तसेच, महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत गर्दी नियंत्रण, जलप्रवासी वाहतूक, व होडीतील सुरक्षेसाठी एकूण १,०५० लाईफ जॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.या नियोजनासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

get_footer();