आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणारे गजाआड

Spread the love

पुणे : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून पुण्यात विमानाने येऊन, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या दोघा चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

नियाज इजाज मोहम्मद (वय २९) आणि सावेज सलीम अली (वय ३०, दोघेही रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

गेल्या महिन्यात, ९ मे रोजी खडकी बाजार परिसरातील एका बँकेच्या एटीएम केंद्रात ते पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी नियाज आणि सावेज हे एटीएमच्या बाहेर दबा धरून बसले होते.

फिर्यादी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांचा गोपनीय पिन पाहून त्यांच्याकडे एटीएम कार्ड मागितले. त्यांनी नकार दिला असता, त्यांना मारहाण करून त्यांचे कार्ड घेऊन आरोपी पळून गेले. दुसऱ्या एटीएममधून त्यांनी फिर्यादींच्या खात्यातील १,०४,६५० रुपये काढले.

पैसे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

तांत्रिक तपास आणि पोलीस अंमलदार प्रताप केदारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नियाज आणि सावेज हे उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी नाना पेठेतील एका लॉजमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.

आरोपी उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन पुण्यात फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, हवालदार प्रशांत माळी, संदेश निकाळजे, अश्विनी कांबळे, भाऊसाहेब शेवरे, सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषीकेश दिघे, दिनेश भोये, प्रताप केदारी यांनी पार पाडली.

get_footer();