आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

Spread the love

पुणे : एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह दोघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सिंहगड रोड परिसरातील एका तरुणाच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी ७ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर एपीके फाईल पाठवली होती. ती उघडल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यातून ७ लाख ६६ हजार रुपये लांबविले. ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत बिबवेवाडी भागातील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर एअर इंडिया मेंबरशिपच्या नावाने बनावट पोस्ट पाठवण्यात आली होती.

त्या पोस्टमधील एपीके फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख २२ हजार रुपये चोरून नेले. तसेच त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक हॅक करून खात्यातील रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

get_footer();