आवृत्ती पुणे
← Back to Homepage

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

Spread the love

पुणे : किराणा दुकान व पानटपरीवर गुटखा, सिगारेटची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर आंबेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. कात्रज, आंबेगाव व वडगाव येथील पाच दुकानदारांना अटक करून त्यांच्या कडून ४९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

राहुल प्रकाश संचेती (वय ३२, रा. शंभुराजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव), प्रमोद प्रकाश संचेती (वय ३६, रा. आंबेगाव), रवींद्र राजकुमार वाकडे (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज), सुनिल दगडु सुरवसे (वय २४, रा. वडगाव) आणि प्रशांत बच्चा कुलाल (वय ४१, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आंबेगाव पोलिसांना आंबेगाव व कात्रजमधील किराणा दुकानांमध्ये गुटखा व सिगारेटची विक्री केली जात असल्याची तसेच पानटपरीवर गुटखा विकला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आंबेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.

या कारवाईत एकूण ४९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस अंमलदार अजय रामदास कामठे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय कामठे यांना शासनाने प्रतिबंधित केलेला आर.एम.डी., विमल पानमसाला गुटखा दुकानात व टपरीवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी ‘आनंद ट्रेडर्स’ (भाऊंची पुण्याई बिल्डिंग) येथे छापा टाकला. त्यांच्या किराणा दुकानात ३९ हजार ६५० रुपयांचा गुटखा व सिगारेटचा साठा मिळाला. त्यानंतर ‘अक्षय पान शॉप’ येथे छापा टाकण्यात आला.

तेथे ३ हजार ४७० रुपयांचा गुटखा आढळून आला. ‘माऊली पान शॉप’ या टपरीत ३ हजार ६०० रुपयांचा गुटखा मिळाला. ‘शिवराज पान शॉप’मध्ये ३ हजार १८० रुपयांचा गुटखा मिळून आला. आंबेगाव पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे यांनी केली आहे.

get_footer();