आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Spread the love

पुणे : रांजणगाव येथील लाईफ केअर क्लिनिकवर पोलिसांनी छापा घालून बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. बीएएमएस डॉक्टर महिला पेशंटची छोट्या प्रोबद्वारे, जो मोबाईलला वायफायने कनेक्ट करून मोबाईल अ‍ॅपद्वारे सोनोग्राफी करत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले.

आकाश सुभाष मलगुंडे (वय ३५, रा. धनगरवाडा, ढोकसंगवी, ता. शिरूर) आणि एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे (वय ५२, रा. समर्थ पार्क, केसनंद गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाला बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले आणि शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन धस यांच्या सहकार्याने महिला डमी पेशंट तयार करण्यात आली.

एजंट नरेंद्र ठाकरे याने डमी पेशंटला सरकारी वाहनाने रांजणगाव एमआयडीसी येथील कारेगाव येथे नेले. तेथून एजंट ठाकरे याने त्यांना खासगी गाडीने लाईफ केअर क्लिनिक येथे आणले. पोलीस त्यांच्या लाईव्ह लोकेशनवर नजर ठेवून होते. ते लाईफ केअर क्लिनिकमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष गर्भलिंग तपासणी करत असताना पोलिसांनी वैद्यकीय अधिकार्‍यांसह तेथे छापा टाकला. त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या क्लिनिकमध्ये व एजंट नरेंद्र ठाकरे यांच्या गाडीत गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य तसेच गर्भपातासाठी उपयोगात येणारी औषधे मिळून आली. पोलिसांनी सरकारी पंच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, स्थानिक वैद्यकीय अधीक्षक सचिन धस यांच्या उपस्थितीत पंचनामा करून कारवाई केली.

या कारवाईत वेंगनार गाडी, गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य व गर्भपातासाठी उपयोगात येणारी औषधे असा एकूण ७ लाख ७३ हजार ७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, भरत गुंडवाड, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे, किर्ती मांदळे यांनी केली.

get_footer();