आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

Spread the love

पुणे : २०१८ पूर्वी ज्या फर्ममार्फत त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती, त्याच कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ वकिलाला तब्बल १४ कोटी २५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत नारायण पेठेत राहणाऱ्या एका ६८ वर्षांच्या ज्येष्ठ वकिलांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निर्मल बंग सिक्युरिटीज प्रा. लि. या शेअर ट्रेडिंग कंपनीमध्ये २०१८ पूर्वीपर्यंत त्यांच्या डिमॅट अकाऊंटद्वारे ट्रेडिंग करीत होते.

ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने ती निर्मल बंग सिक्युरिटीजच्या मुंबई हेड ऑफिसमधून मॅनेजर दिव्या कपाडिया बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीने प्रायमरी ब्लॉक ट्रेडिंगसाठी ‘ऐश्वर्या प्लॅन’ योजना ३ नोव्हेंबर २०२५ पासून ३ महिन्यांसाठी सुरू केल्याचे सांगितले. त्यासाठी २ हजार सिलेक्टेड मेंबर्स घेत असल्याचे सांगून त्यात त्यांचे सिलेक्शन झाल्याचेही सांगितले.

फिर्यादी यांचे निर्मल बंगमध्ये डिमॅट अकाऊंट असल्याने तेथूनच फोन आल्याचे त्यांना वाटले. या योजनेत ३०० टक्के नफा मिळेल व त्यावर १० टक्के सर्व्हिस चार्जेस द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यांनी तयारी दर्शविल्यानंतर एका लिंकद्वारे त्यांचे डिमॅट अकाऊंट ओपन करण्यात आले. त्यावर लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये स्टॉकचे सर्व व्यवहार दिसत होते.

त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, सेबीची परवानगी घेऊन ट्रेडिंगसाठी आमच्या असोसिएट्सच्या नावाने वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली असून ती फक्त या योजनेसाठी वापरली जाणार आहेत. आम्ही सांगू तेव्हा त्यात पैसे ट्रान्सफर करा, असे सांगण्यात आले. त्यांना ‘V5 निर्मल बंग सिक्युरिटीज’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी ३ नोव्हेंबर २०२५ पासून ८२ व्यवहारांद्वारे एकूण १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. त्यावर त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये नफ्यासह ३९ कोटी २६ लाख ४२ हजार ८०० रुपये दिसत होते.

त्यांनी नफा विड्रॉ करायचा असल्याचे सांगितल्यावर नफ्याच्या १० टक्के कमिशन भरावे लागेल, अन्यथा पैसे विड्रॉ करता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. नफ्यातून कमिशनचे पैसे वजा करून उर्वरित पैसे देण्यास नकार देण्यात आला.

त्यानंतर त्यांनी कमिशनचे पैसे भरले. तरीही त्यांना इन्कम टॅक्स तसेच सिक्युरिटी डिपॉझिट अशा कारणांवरून आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी तेही भरले. तरीही पैसे विड्रॉ करण्यास नकार देण्यात आला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी १९३० वर तक्रार केली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

get_footer();