आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले

Spread the love

पुणे : “या भागात खूप चोर्‍या झाल्या आहेत,” अशी बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला पिशवीत दागिने काढून ठेवण्यास सांगितले आणि नजर चुकवून ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील महालक्ष्मी अ‍ॅटो मोबाईल्स गॅरेजसमोर सोमवारी दुपारी पाच वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सायंकाळी पायी जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडे बतावणी केली. “या भागात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.

दागिने काढून पिशवीत ठेवा,” अशी बतावणी चोरट्याने केली. त्यांना बोलण्यात गुंतवून, त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने ५५ हजार रुपयांची सोन्याची माळ लांबवून घेतली आणि पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौकात २० जून रोजी मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी महिलेकडील रोकड, मोबाइल संच आणि दागिने लांबविल्याची घटना घडली होती. पोलीस असल्याची बतावणी, मोफत साडी वाटप, धान्य वाटप अशी आमिषे दाखवून चोरटे ज्येष्ठ नागरिक महिलांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे.

get_footer();