आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

Spread the love

पुणे : जगप्रसिद्ध शेफ आणि ‘मास्टरशेफ इंडिया’ सीझन ९ चे परीक्षक विकास खन्ना यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रतिष्ठित ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, सूर्यदत्त गोल्ड मेडल आणि ‘सूर्यदत्त’चा पारंपारिक स्कार्फ देऊन खन्ना यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी प्राचार्या डॉ. रसिका गुमास्ते व ज्योतिमा श्रीवास्तव उपस्थित होत्या.

जागतिक स्तरावर भारतीय पाककला आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राचा तिरंगा अभिमानाने फडकवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेलिब्रिटी शेफ, लेखक आणि मानवतावादी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या शेफ विकास खन्ना यांच्या ग्लोबल हॉस्पिटॅलिटी व क्युलिनरी आर्ट्स क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची तसेच भारतीय पाकसंस्कृतीला जागतिक पातळीवर दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘सूर्यदत्त’ संस्थेच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आजवरच्या माझ्या प्रवासाला आणि केलेल्या कष्टांना मिळालेली पावती आहे, अशी भावना व्यक्त करत विकास खन्ना म्हणाले, “सूर्यदत्तसारख्या प्रतिष्ठित आणि सेवाभावी संस्थेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे.

क्युलिनरी आर्ट्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम तरुण विद्यार्थ्यांसाठी पुण्यासारख्या ‘विद्येच्या माहेरघरातून’ असा सन्मान मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे सूर्यदत्त संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. हॉटेल मॅनेजमेंट हे केवळ करिअर नसून ती एक सेवा आहे.

सूर्यदत्त संस्था ज्या पद्धतीने केवळ पदव्या न देता विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची रुजवणूक करत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा संस्थांची मोठी गरज आहे.”

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अमृतसरच्या अरुंद गल्ल्यांपासून ते न्यूयॉर्कमधील मिशेलिन स्टार रेस्टॉरंटपर्यंतचा विकास खन्ना यांचा प्रवास हा केवळ पाककलेपुरता मर्यादित नसून तो जिद्द, चिकाटी आणि जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय खाद्यपरंपरेचा गौरव वाढवताना त्यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित केले. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत सूर्यदत्त संस्थेने त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांनी केवळ उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ बनवण्याचे कौशल्य जगासमोर सादर केले नाही, तर क्युलिनरी आर्ट्स या क्षेत्राला जागतिक स्तरावर मानाची प्रतिष्ठाही मिळवून दिली आहे.”

सुषमा चोरडिया यांनी विकास खन्ना यांच्या जागतिक प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “शेफ विकास खन्ना यांची यशोगाथा ही स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. मनामध्ये जिद्द आणि आपल्या कलेप्रती अपार निष्ठा असेल, तर ‘अमृतसर ते अमेरिका’ हा संघर्षमय प्रवास मुळीच अशक्य नाही, हा विचार आमच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

जागतिक स्तरावर खन्ना यांनी भारतीय पाककलेची उंचावलेली मोहोर आमच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी यशाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.”

शेफ विकास खन्ना हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक नसून भारतीय संस्कृती, चिकाटी आणि जागतिक यशाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या पाककलेच्या माध्यमातून भारताची समृद्ध संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली आहे. खन्ना यांच्यासारख्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होतो. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते व त्यांच्यात चैतन्यमय ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळते. त्यामुळे अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यावर सूर्यदत्त संस्थेने नेहमीच भर दिला आहे. — प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स.

get_footer();