ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक
डिलिव्हरीसाठी आलेल्या दोघांना खडक पोलिसांनी पकडले : २ लाखांचा गुटखा जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रस्त्यावरून वाहतूक करताना पोलिस कारवाई करत असल्यामुळे आता इतर मालासोबत ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या मार्गाने शहरात गुटख्याचा पुरवठा सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. लोहियानगर येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट येथे आलेल्या मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या दोघांना खडक पोलिसांनी पकडले असून २ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष रामलखन रॉय (वय ३५, रा. नक्षत्र अंगण प्लॉट, लवासा रोड, पिरंगुट) आणि विष्णु रामरतन गुप्ता (वय ३४, रा. शांताईनगर, मारुंजी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या दुकानात हुबळीहून माल आला होता. त्यात गुटखा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, व पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ ट्रान्सपोर्टजवळ सापळा रचण्यात आला.
संतोष रॉय आणि विष्णु गुप्ता हे रविवारी रात्री साडेदहा वाजता माल घेण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हुबळीहून आलेला महक सिल्वर पान मसाला व एम तंबाखू जर्दा असा एकूण २ लाख १ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत बोराडे करीत आहेत.
