आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

Spread the love

पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार आरोपी अक्षय शांताराम सावंत (रा. कर्वेनगर) यास गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने कोथरूड परिसरातून अटक केली. दोन वर्षांसाठी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार असलेला आरोपी आदेशाचे उल्लंघन करून शहरात परतल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) यांच्या आदेशानुसार आरोपीवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, आरोपी पुणे शहरात परत येत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माऊली ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारू, पोलीस हवलदार अमोल काटकर, यांच्यासह पथक आशिष गार्डन, सागर कॉलनी, कोथरूड येथे सापळा रचून थांबले. काही वेळात आरोपी त्या ठिकाणी आल्यावर त्यास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस हवालदार साठे, पोलीस शिपाई अक्षय गायकवाड, महिला पोलीस हवालदार वाघमारे यांनीही सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

get_footer();