आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • October 22, 2025
Spread the love

पुणे : प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिक दिवाळी सणात मग्न असताना, खडकी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

या घटनेत रोहित अमर उबाळे (वय २५, रा. तुकाराम देवकुळे पथ, नटराज चौक, बोपोडी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक जगदीश कोरी (वय २०, रा. भाऊपाटील चाळ, बोपोडी), करण केविन पॅट्रिक (वय २०, रा. गोपी चाळ, मुंबई–पुणे रोड, बोपोडी) आणि सिंधू ऊर्फ फॉरेनर सचिन ढवळे (वय २०, रा. नाईट चाळ, बोपोडी) यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बोपोडीतील तुकाराम देवकुळे पथ येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची लहान बहीण स्नेहा आणि आरोपी दीपक कोरीची बहीण लक्ष्मी या दोघी मैत्रिणी आहेत. दिवाळी सणानिमित्त स्नेहाच्या हातावर मेंदी काढण्यासाठी लक्ष्मी तिच्या घरी आली होती. दरम्यान, स्नेहाचा मावस भाऊ दक्ष सोळंखी आणि लक्ष्मी यांच्या प्रेमसंबंधाची माहिती दीपक कोरीला मिळाली.

ही बाब मनात राग धरून दीपक कोरी दोन मित्रांसह रात्री उबाळे यांच्या घराबाहेर आला. त्याने स्नेहाला बाहेर बोलावून दक्ष कोठे आहे, अशी चौकशी केली. त्या वेळी रिक्षात बसलेला रोहित उबाळे त्यांच्याकडे गेला.

दीपकने त्याच्याकडे दक्षबद्दल विचारणा केली असता, रोहितने “माहित नाही” असे उत्तर दिले. हे ऐकून आरोपी भडकले आणि त्यांनी रोहितच्या कानाखाली मारत धक्काबुक्की केली. त्यानंतर दीपकने कमरेजवळील कोयता काढून रोहितच्या छातीवर आणि हातावर वार केले.

दिवाळीच्या रात्री आतषबाजी सुरू असताना ही रक्तरंजित घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ आरोपींच्या शोधाला सुरुवात केली.

पोलिस अंमलदार सुधाकर डिके यांना माहिती मिळाली की दीपक कोरी हा शहर सोडून जाण्याच्या तयारीत असून, पैसे आणि कपडे घेण्यासाठी हरिष ब्रीजखाली येणार आहे. या माहितीनुसार पोलिस अंमलदार आबा केदारी, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले आणि ऋषी दिघे यांनी वेशांतर करून त्या परिसरात सापळा रचला.

काही वेळाने दीपक तेथे आल्यानंतर पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर दोघांची नावे सांगितल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली. जुन्या भांडणातून आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने या तिघांनी हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिघांना घटनास्थळावर घेऊन जाऊन धिंड काढली.

दिवाळीच्या सणाच्या दिवशीही पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेसाठी केलेली ही तत्पर आणि प्रभावी कारवाई सर्वत्र कौतुकास पात्र ठरली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, हवालदार शशिकांत सपकाळ, तसेच पोलीस अंमलदार आबा केदारी, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले आणि ऋषी दिघे यांनी केली आहे.

get_footer();