आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

Spread the love

पुणे : सराईत अल्पवयीन गुन्हेगारांनी खंडणी उकळण्यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची घटना गुलटेकडी येथे शुक्रवारी रात्री घडली. स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

याबाबत सागर मल्लीकार्जुन शेखापुरे (वय २९, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत शुक्रवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही गुन्हेगार अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोघे गुलटेकडी येथील, तर इतर दोघे वडगाव बुद्रुक आणि नर्‍हे येथे राहतात. त्यांच्यातील प्रमुख अल्पवयीन मुलगा हा गेल्या वर्षी सिंहगड रोड येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तो १५ दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून सुटला होता.

हे चौघेही जण शुक्रवारी रात्री गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत आले. त्यातील प्रमुख अल्पवयीन गुन्हेगाराने आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार करून “आम्ही इथले भाई आहोत, या ठिकाणी आमचेच चालणार. मी आताच एकाचा मर्डर करून बाहेर आलो आहे.

इथे राहायचे असेल तर मला दरमहा १० हजार रुपये द्यावे लागतील,” असे मोठ्याने ओरडून दहशत पसरवली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी हातातील धारदार लोखंडी शस्त्रे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, सहायक पोलीस निरीक्षक नामदे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख आणि राकेश सुर्वे यांनी या चौघांचा शोध घेऊन त्यांना जांभुळवाडी येथील श्री साई अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून २ पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.

get_footer();