आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुबई–पुणे विमानात प्रवासादरम्यान दीड लाखांची चोरी

Spread the love

पुणे : दुबई ते पुणे विमान प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून दीड लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन आणि दिल्लीहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या.

या तीनही घटनांचा तपास अद्याप लागलेला नसताना ही चौथी घटना घडली आहे. या चोऱ्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर होतात, याचा छडा विमान कंपन्या आणि पोलीस लावू शकलेले नाहीत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे उतरलेल्या स्पाईस जेटच्या प्रवाशाच्या बॅगेतील लॉक तोडून दीड लाख रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सुयोग सपकाळ (वय ४५, रा. पिंपरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ हे पर्यटन टूर व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त दुबईला गेले होते.

दुबईतील त्यांच्या मित्राने त्यांना दीड लाख रुपये वैयक्तिक व्यवहारासाठी रोख स्वरूपात दिले होते. त्यांनी ही रक्कम पिवळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत ठेवली होती. गुरुवारी, १ मे रोजी रात्री पावणे दहा वाजता ते दुबई विमानतळावरून स्पाईस जेटच्या विमानाने निघाले.

त्यांनी ट्रॉली बॅग तपासणीसाठी विमान कंपनीकडे दिली होती. शुक्रवारी, २ मे रोजी पहाटे ते पुणे विमानतळावर पोहोचले. त्यांनी बॅग ताब्यात घेतली असता, बॅगेचे कुलूप तुटलेले आढळून आले.

बॅगेतील सामान अस्ताव्यस्त होते. त्यांनी बॅगेची पाहणी केली असता, आतील दीड लाख रुपये गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर सपकाळ यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

get_footer();